Monday, April 22, 2024

भैरवगड ते भैरवगड - I

सुरुवात - किल्ले भैरवगड (शिरपुंजे)

काळ कोरोनाचा होता. म्हणजे लॉकडाऊन वगैरे नव्हतं, पण जग पूर्णपणे बाहेर पडलं नव्हतं अजून कोरोनामधून. त्यावेळी अल्पपरिचित किंवा भटकायला फारसे कोणी जवळ न केलेले डोंगर पालथे घालायचं चाललं होतं आमचं. त्याच वेळेला नोव्हेंबर महिना, म्हणजे वर्षातला ट्रेकिंगच्या सुवर्ण काळातला हा महिना, त्यामुळे आमचा जम्बो प्लॅन ठरला.

हा रेंज ट्रेक. म्हणजे जिकडून चढायचं, तिकडेच उतरायचं नाही परत. आता ह्यासाठी नियोजनानंतर लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट. जो आमचा आम्ही स्वतः चालक म्हणून करू शकणार नव्हतो. कारण चढायचं जिकडून तिथे लावलेली गाडी उतरायच्या ठिकाणी कोण घेऊन येणार? मग चालक दुसरा घ्यायचा असं ठरलं, अर्थात गाडी पण. या भटकंतीत नाना, विनीत, मनीष यांच्याबरोबर अचानक एन्ट्री मारून प्रमोद सामील झाले आणि ग्रीन एक्सप्रेस घेऊन चालक म्हणून लालासो आले.

खरं तर याआधी आमची एक वेगळीच गंमत झाली. एक तर शेडबाळे सर येणार होते, त्यांचं येण्याचं रद्द झालं. त्यात संध्याकाळ नंतर एकदम भरून आलं आणि पाऊस सुरू झाला. आता हा रेंज ट्रेक, त्यात मुक्कामाचं नियोजन असलेला होता. तेही मुक्कामाला वरून छप्पर असलेलं, डोंगरावर काहीही नसणार हे माहिती होतं, म्हणजे गुहा, मंदिर वगैरे... त्यात जी चढाई उतराई होती, तिथे पावसामुळे कितपत शक्य होणार होतं हा ही प्रश्न होताच. त्यामुळे मुळात हा प्लॅनच Continue करावा, की सरळ नियोजन रद्द करून, घरी पाऊस बघत बसावं? असाही विचार झाला. पण त्यातून "जो होगा, देख लेंगे" म्हणून गाड्या हाकल्या.

त्यात पुण्यातून मी नेहमीप्रमाणे एकटाच. मी चिंचवडला दाखल झालो आणि रात्री शेडबाळे सरांच्या "ग्रीन एक्सप्रेस" मधून चिंचवडहून निघालो. ही "ग्रीन एक्सप्रेस" म्हणजे मागे मस्त हौदा असलेली मालवाहू गाडी. त्यामुळे काहीजण मागे सरळ हौद्यात जाऊन झोपले. लालासो दिवसभर काम करून आल्याने, हायवे सोडून गाडी गावात गेल्यावर रात्री एकच्या दरम्याने एक्सप्रेसचा ताबा मी घेतला आणि त्यांना विश्रांती दिली.

शिरपुंजे गावातलं हनुमान मंदिर

शिरपुंजे गावात पोचलो, ते साधारण तीन साडेतीनच्या दरम्याने. असं शुक्रवारी रात्री मंदिरात येऊन राहायचं आणि शनिवारची पहाट मारुतीरायाच्या पायाशी उठून करायची हा जणू शिरस्ता झाला होता. त्याप्रमाणे पहाटे उठलो आणि मंदिराच्या मागेच दिसला भैरवगड किल्ला.

मंदिराच्या मागे भैरवगड किल्ला

हा भैरवगड किल्ला म्हणजे पायथ्याशी शिरपुंजे गाव असलेला, त्यामुळे "शिरपुंजेचा भैरवगड" किल्ला. या किल्ल्यावर भैरवाचं मोठं मंदिर असल्याने चांगला राबता आहे. गडावरच्या पायऱ्यांच्या मार्गाला सुरक्षिततेसाठी रेलिंगही केलेलं आहे.

अरे हो... रेंज ट्रेक म्हणजे कुठपासून ते कुठपर्यंत सांगायचं राहिलं की! तर, शिरपुंजे गावातून चढाई सुरू करून भैरवगड किल्ला पाहायचा आणि वर चढून पुढे घनचक्कर, गवळदेव ही शिखरं करून कात्राबाई या डोंगराला भेट द्यायची. आणि नंतर कुमशेत गावात उतरायचं असं मूळ नियोजन!

पायऱ्यांवरून सुरुवात

रेलिंग, पायऱ्या

आता इथे, भैरवगड नंतर वाट अशी पूर्णपणे मळलेली नाही. शिरपुंजे गावात गाडी लावली आणि सात वाजता वाट दाखवायला वाटाडे मामा बरोबर घेऊन आम्ही निघालो. पायऱ्याच्या सुरुवातीला कमानी पुढून चढायला सुरुवात केली. सुरुवातीला पायऱ्या, मध्येच गायब, परत चार पायऱ्या, मग दगड-गोटे, तर कधी नुसतीच पायवाट... पण बऱ्यापैकी रेलिंग लावलेलं असल्याने इथे चुकायचा संभव तर अजिबात नाही आणि त्यातून त्यामुळे हा मार्ग सुरक्षित झालेला आहे. रमत-गमत, फोटो काढत, पाऊण तासात खिंडीत पोचलो.

भैरवगड-घनचक्कर खिंड (शिरपुंजे गावाकडची बाजू)

भैरवगड-घनचक्कर खिंड (पलीकडची बाजू)

खिंडीच्या जरा आधी उजवीकडे वाढ जाते ती घनचक्करकडे आणि डाव्या बाजूला वर खिंडीत आणि तिथून डावीकडे भैरवगड किल्ल्यावर. या खिंडीतून पलीकडे व्ह्यू फार छान दिसतो. डावीकडच्या गडाच्या वर जायच्या वाटेवर, परत व्यवस्थित पायऱ्या आणि रेलिंग आहे.

टाकी

गडावर पोचल्या-पोचल्या जे अवशेष दिसतील, ते टिपायला सुरुवात केली. पाण्याची टाकी, काही उघडी, काही जोड-टाकी, काही वरून दगडी छप्पर असलेली, काही आतून कोरून काढलेली, काही खांब टाकी वगैरे वेगवेगळ्या प्रकारची टाकी बघितली.

मंदिराची वाट

मग ह्या गडाची ओळख असलेलं एकमेवद्वितीय असं भैरवाचं मंदिर पाहिलं. या मंदिराचं स्थानच अतिशय सुंदर आहे. एकतर हे मंदिर जमिनीखाली आहे. वळणावळणाची छोटीशी वाट, त्यात पायऱ्या, मध्येच विरगळी ठेवलेल्या अश्या वाटेवरून खाली जातानाच आपण अतिशय सुंदर ठिकाणी जात आहोत हे जाणवतं. गावकऱ्यांनी लोखंडी रॉड लावून, त्याला घंटा, गुहेला दरवाजा, आत मध्ये मूर्तीला रेलिंग अशा प्रकारे मंदिर सजवलेलं आहे.

भैरवनाथ

दरवाजातून आत गेल्यावर एका सुंदर कोनाड्यातून पलीकडे दिसते ती भैरवनाथाची घोड्यावर बसलेली पूर्णाकृती मूर्ती. अप्रतिम शिल्प आहे हे. सुंदरसा घोडा, त्यावर आरूढ भैरवनाथ! पूर्ण दगडात कोरलेली मूर्ती, ही फारच सुंदर आहे. मंदिरात काही काळ घालवल्यावर बाहेर आलो. जवळपास आणखी काही वीरगळी ठेवलेल्या आहेत, गणेश मूर्तीही आहे.

पिण्याच्या पाण्याचं टाकं/गुहा

गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांपैकी पिण्याचं पाणी समजावं, म्हणून एका टाक्याच्या बाहेर सरळ "पाणी प्या" असं लिहिलेलं दिसलं. वास्तविक इतर टाक्यातलं पाणी सुद्धा काही फार वाईट नव्हतं. पण इथे टाके श्रीमंती आहे. त्यामुळे त्या सगळ्या बऱ्यापैकी चांगल्या स्थितीतील पाण्यातुन सुद्धा, अजून चांगलं, म्हणून हे खास राखून ठेवलेलं पिण्याचं पाणी. खरंतर हे टाकच दिसत नव्हतं. ही व्यवस्थित कोरलेली गुहा आहे. दरवाज्यावर छान कमान आहे. परंतु त्यात कायमच पाणी साठत असल्याने आणि वर नैसर्गिक छत, सूर्यप्रकाशाचा अभाव, त्यामुळे त्यात शेवाळं धरत नसल्याने, याला पिण्याच्या पाण्याचा टाकं असं ठरवलं गेलं असेल.

अजून टाकी

किल्ले भैरवगड वरून सुंदर दृश्य

तसं म्हटलं तर गडफेरी पूर्ण झाली होती. गडावर टाकं-श्रीमंती म्हणजे किती? तर जवळपास २० पेक्षा जास्त टाकी आहेत. भैरवाची पूर्णाकृती मूर्ती, वीरगळी, गणपती वगैरे इतरही सुंदर गोष्टी आहेत. किल्ल्याची तटबंदी, दरवाजा, बुरुज असं मात्र काहीही सुस्थितीत बघायला मिळत नाही. पण गडावरून अतिशय सुंदर दृश्य मात्र बघायला मिळतं. कळसुबाई, हरिश्चंद्रगड, कलाडगड, कुंजरगड उर्फ कोंबडा, नाणेघाट, टोलारखिंड असा अफाट प्रदेश पाहायला मिळतो. दोन दिवसाच्या नियोजनाची ही फक्त सुरुवात असल्याने तिथून लवकरच पुढे प्रस्थान केलं. गडावरून उतरून खिंडीत आलो. १० पावलं उतरून डावीकडे, (खालून येताना उजवीकडची वाट) घनचक्करकडे जाते, तिकडे वळलो.

घनचक्कर

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? असं विचारल्यास "कळसुबाई" हे उत्तर बहुतेक सगळेच देतील. परंतु त्या खालोखाल दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर कोणतं हे मात्र सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही. चौथ्या क्रमांकवरचं कसं माहिती असेल मग? तर, घनचक्कर हे चौथ्या क्रमांकावर येतं.

झापं

वरच्या मजल्यावरील झापं

ह्या खिंडीतून घनचक्करकडे वाट मळलेली दिसत होती. याचं कारण म्हणजे इथे कडेकपारीत गावकऱ्यांची झापं आहेत. इथे गाई-गुरांसाठी गोठ्यासारखी जागा केलेली असते राहायला. त्यामुळे थोड्या अंतरापर्यंत वाट मळलेलीच असणार होती. ह्या वाटेवरून निघालो आणि ते झापांजवळ पोचलो. तिथे एक गुराखी काका भेटले. पलीकडे जायच्या वाटेवरच झापं लावून हा आसरा केला असल्याने, त्यामधूनच पलीकडे जायला लागणार होते किंवा त्याच्या मागून दरीच्या बाजूने. आता त्या झापांच्या आत मध्ये गुरं असल्याने आम्ही दरीच्या बाजूने सावकाश पलीकडे गेलो. अशीच झापं पुढे आहेत, जी अजून वरच्या बाजूच्या कपारींमध्ये आहेत. त्यात गुरांबरोबरच गुरख्यांसाठीही रहायची व्यवस्था दिसत होती.

पुढे चढ आहे काही वेळानंतर एका विस्तीर्ण पठारावर आलो. या पठारावर एवढी मोकळी जागा आहे, की इथे आल्यावर वाट नक्की कोणती ते कळतच नाही. सापडतील त्या वाटांवरून जायच्या नावाखाली कोणीही इथल्या इथेच चक्कर मारत बसू शकतो, म्हणून या शिखराला "घनचक्कर" हे नाव सार्थच आहे.

गारदेवी

चढाव चढून आल्यानंतर एके ठिकाणी भरपूर गारगोटीचे दगड जमवून ठेवलेले दिसले. हे "गारदेवीचे ठाण". या डोंगर रांगेत गारगोटीचे दगड प्रचंड प्रमाणात सापडतात. त्यातलेच दगड इथे येता जाता अर्पण केले जातात आणि इथे हे गारदेवीचं ठिकाण बनलं आहे. अश्या या निर्मनुष्य ठिकाणी अशी देवस्थानं नक्कीच इथे येणाऱ्यांचा आधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असणार.

आमच्याबरोबर आलेल्या वाटाड्या मामांबरोबर एक कुत्राही आमची साथ देत होता. इथे यायला आम्हाला दोन तास लागले होते. तसं म्हटलं तर अंतर फार कापलं होतं किंवा खूप तास चाललो होतो, असं काही नव्हतं. पण चढण आणि वरतून ऊन यामुळे काहीतरी झालं होतं आणि माझ्या उजव्या पायात गोळा आला. जवळपास पोचलोच होतो, पण पाय गोळा धरून बसला होता. मग "गोळा आल्यावर करण्याचे पन्नास उपाय" या bestseller पुस्तकातले शक्य ते उपाय सुरू केले.

तोवर समोरच घनचक्करचं सर्वोच्च टोक दिसलं आणि आत्यानंद झाला. आणि त्या सर्वोच्च ठिकाणावर पोचल्यावर काय सांगू महाराजा... सगळीकडे सोनकीच सोनकी! सगळा भाग पिवळा धमक दिसत होता. त्यातून वर पोचलो तर पलीकडे निसर्गाने आमच्यासाठी चित्र चितारून ठेवलेलं होतं.

घनचक्कर वरून अफाट नजारा

समोरच भंडारदराचा जलाशय त्याच्या बॅकग्राऊंडला डोंगरच डोंगर घेऊन थाटात पसरलेला. बरं हे डोंगर लहान मोठे नव्हे तर आजा उर्फ आजोबा, कात्राबाई, AMK, कळसुबाई हे भले थोरले नग. बाकी इतर लहान-मोठे डोंगर आहेतच. हे दृश्य पाहताना पायात आलेला गोळा बहुतेक विरघळला. फोटोमुळे वगैरे थोडी विश्रांतीही मिळाली. त्या समोरच्या निसर्गचित्रात सर्वात डावीकडे गवळदेवचं टोक दिसलं होतंच. आता काय महाराष्ट्रातल्या चौथ्या क्रमांकाच्या टोकावर आलेलो होतोच, गवळदेवला पण जाऊच.

उचललं सामान. आता सामान म्हणजे त्यात सगळंच होतं. मुक्काम होता वरतीच, म्हणजे आज दिवसभराचं खाण्याचं सामान, रात्रीचा स्वयंपाक आणि उद्याची दुपारची व्यवस्था पण. आणि हो मुक्काम म्हणजे स्लीपिंग बॅग आणि बरोबर टेन्ट पण आलाच की! हे सगळं उचललं आणि वाटलं की सामान जड झालंय. वास्तविक माझी स्लीपिंग बॅग मोठ्या आकाराची आहे, सॅक मध्ये टाकली की सॅग भरूनच जाते. म्हणून यावेळी ती सॅकच्या खाली, बाहेरून बांधली होती. त्यामुळे सगळं अजूनच बोजड वाटत होतं.

तर हे सामान घेतलं आणि घनचक्करच्या पलीकडे, गवळदेवच्या बाजूला उतरायला सुरुवात केली. आता माझा अंदाज होता की घनचक्कर हे एक टोक आहे आणि पुढे गवळदेव हेही टोकच आहे. म्हणजे आपल्याला फार चढाई करावी लागणार नाही. कारण घनचक्कर म्हणजे १५१० मीटरवर आम्ही पोहोचलो होतोच आणि गवळदेव म्हणजे १५२५ मीटर.. म्हणजे फक्त १५ मीटर की हो!!! म्हणजे घनचक्करचं पठार चालायला जो वेळ लागेल तेवढाच वेळ. मग १५ मीटर म्हणजे २ उड्यात गवळदेव टॉप!

WindowsXP ची आठवण करून देणारा Wallpaper Photo

समोरच गवळदेवचं सर्वोच्च टोक दिसलं सुद्धा. अगदी WindowsXP चा वॉलपेपर शोभावा असा एक क्लिक मिळाला. म्हणजे मग पोचू कि आता थोड्याच वेळात त्याच्यावर पण..

टोकाखालचा हिमनग - गवळदेव

पण हा गवळदेव इतक्या सहज प्रसन्न होत नसतो, हे कुठे माहिती होतं? त्यात उतरायला लागल्यावर "घनचक्कर" म्हणजे आपल्या "घनं" म्हणजे ढग आणि त्यात बोलावून चक्कर आणणं, असला प्रकार आहे. पलीकडे उतरायला लागलो आणि त्या वाटांवरनं लक्षात यायला लागलं. त्यात पुढे गवळदेव हे वरून नुसतं टोक दिसलेल्या हिमनगाने आता आपला पाण्याखालचा भाग दाखवला. कारण मध्ये खिंडीत, म्हणजे आम्ही २५० मीटर उतरून आपण १२६० मीटरवर येतो एकदम सापाच्या तोंडातून आल्यासारखं आणि पुढे तेवढेच परत वर चढायचं, बरं तिकडे सापाच्या तोंडातून आल्यावर मिळायला हवी तशी शिडी पण नाही, एक-एक घर सरकायचं... त्यानंतर वरती हे गवळदेव साहेब!

बरं तेवढ्यात माझ्या सॅकच्या एका बाजूने "कट" असा आवाज आला. नीट बघितल्यावर कळलं, की एक बंद कण्हतोय. मग मात्र समोरचा गवळदेव आणि कण्हणारा बंद असं डोळ्यासमोर येऊन, अजून एक गोळा आला, तो पोटात.

क्रमश:

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!